
ज्येष्ठ चित्रकार व अभ्यासक सुहास बहुळकर यांचे ‘कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या’ हे अत्यंत आगळेवेगळे पुस्तक 9 जून रोजी असलेल्या 351 व्या शिवराज्याभिषेकोत्सव दिनाचे औचित्य साधून प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या समकालीन चित्र-शिल्पांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील शिवछत्रपतींच्या तब्बल महत्त्वपूर्ण शंभर चित्र-शिल्पांचा शोध घेऊन त्यावर लेखन केले आहे.
विशेष म्हणजे, विविध काळात घडविलेल्या शिवाजी महाराजांच्या या चित्र-शिल्पांचा आढावा घेत असतानाच लेखकाने त्या घडविणाऱ्या कलावंतांच्या कथा-व्यथा आणि विलक्षण अनुभव या पुस्तकातून उलगडले आहेत. त्यातील पुरुषोत्तम पंडितांची दोनशे वर्षांपूर्वी लिहिलेली सचित्रपोथी व त्यातील चित्रे तर प्रथमच प्रकाशात येत आहेत. 460 पृष्ठसंख्या आणि भरपूर चित्रे असलेले हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे.