पीयूसी काढणाऱ्यांकडे बनावट विमा पॉलिसी सर्टिफिकेटचा साठा सापडला

सामना ऑनलाईन । मुंबई

पीयूसी व्हॅनमध्ये बसून चालकांना नामांकित कंपनीच्या नावाने गाड्यांची बनावट विमा पॉलिसी सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या चार जणांच्या टोळीला गेल्या आठवडय़ात युनिट-12 ने पकडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या घरात झडती घेतल्यानंतर पोलिसांच्या आणखी एक हजार बनावट पॉलिसी सर्टिफिकेट हाती लागली आहेत.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव येथे विजयकुमार गिरी, आनंद गिरी, सुशील दुबे आणि योगेश मिश्रा हे भामटे चालकांना गाडय़ांची बनावट विमा पॉलिसी सर्टिफिकेट काढून देत असताना सापडले.  रिलायन्स जनरल इन्शुरन्स, एचडीआय मागमा, आयसीआयसीआय लोंबार्ड, इफस्को टोकियो आदी नामांकित कंपनीच्या नावे ही विमा पॉलिसी सर्टिफिकेटस् होती. एका सर्टिफिकेटसाठी आरोपी एक हजार रुपये घेत होते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण येथील चालकांच्या नावाने ही सर्टिफिकेटस् होती.