मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ वाचणार, काय होणार बदल वाचा सविस्तर..

45

सामना ऑनलाईन | मुंबई

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक सुरू असते. या प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे नवीन तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. त्यासाठी लवकरच चाचणी सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद या प्रवासातील वेळ 15-20 मिनिटांनी कमी होण्यासाठी पूल-पूश या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार सुरू आहे. ही चाचणी मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या प्रवासातील वेळ वाचण्यासाठी देखील केली जाणार आहे. यासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर चाचणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठीची आवश्यक कागदपत्र संबंधित विभागाच्या प्रमुखांना पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आठवड्याभरात चाचणी घेण्याची शक्यता आहे. या चाचणीसाठी रेल्वेच्या दान्हीबाजूला लोकोमोटिव इंजिन जोडण्यात येणार आहे. या चाचणीसाठी  JAC कडून परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही चाचणी सुरू असताना रेल्वे मुंबईतून सकाळी 6:25 ला  निघणार असून अहमदाबाद येथे 12:45 वाजता पोहोचणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद प्रवासातील वेळ कमी करणे हा या चाचणी मागील मुख्य हेतू आहे. त्याप्रमाणेच मुंबई ते दिल्ली या प्रवासातील एक तास किंवा 45 मिनिटांनी वेळ कमी होण्यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत.

मुंबई-दिल्ली राजधानीच्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर या आधी एक चाचणी घेण्यात आली होती. ज्यामध्ये घाटाच्या भागात देखील गाडीचा वेग कायम असेल. तसेच नागमोडी वळणावरून जाताना देखील रेल्वे इंजिनावर पूर्ण नियंत्रण असेल. ही चाचणी यशस्वी झाली असून देखील या चाचणील रेल्वे प्रशासनाकडुन मंजुरी देण्यात आलेली नव्हती. मात्र लवकरच त्याला देखील परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई ते अहमदाबाद या प्रवासातील वेळ कमी करणे हा या योजने मागील मुख्य हेतू असून हे तंत्रज्ञान मुंबई ते दिल्ली या लांबपल्याच्या प्रवासात जास्त फायदेशीर ठरणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या