
भावजयीला गावठी कट्टा दाखवताना दिराकडून ट्रिगर दाबला गेल्याने गोळी थेट भावजयीच्या डोक्यातून आरपार गेल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या भावजयीवर रुग्णालयात उपचार उपचार सुरू असताना मृत्यू झाला. फरार आरोपी दिराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनीता संजय भालेराव (वय 32, रा. पोहेगाव, कोपरगाव) असे मृत्यू झालेल्या भावजयीचे नाव आहे. विशाल भालेराव असे अटक करण्यात आलेल्या दिराचे नाव आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे आज सकाळी ही धक्कादायक घटना घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून समजलेली माहिती अशी की, आरोपी विशाल भालेराव हा महिलेचा दीर असून, त्याने गावठी कट्टा आणला होता. हा गावठी कट्टा भावजय सुनीता यांना दाखवत असताना विशालकडून ट्रिगर ओढला गेला आणि गोळी सुनीता यांच्या डोक्यात आरपार घुसली. घटना घडल्यानंतर आरोपी दीर घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती समजताच, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील, नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीता यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गोळी थेट डोक्यातून आरपार घुसल्याने सुनीता भालेराव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.






























































