पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या पत्नींना हवंय इच्छामरण, राज्यपालांकडे केली मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थान सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 2019 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तीन सीआरपीएफ जवानांच्या विधवा पत्नींनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे जीवन संपवण्याची परवानगी मागितली आहे.

राज्यसभा सदस्य किरोड़ी मीना गेल्या काही दिवसांपासून रोहिताश लांबा, हेमराज मीणा आणि जीतराम गुर्जर या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसह आंदोलन करत आहेत. काल ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. याबद्दल त्यांनी ट्विट केले की, “शनिवारी तिन्ही जवानांच्या कुटुंबियांसोबत राज्यपाल कलराज मिश्रा यांना निवेदन देण्यासाठी राजभवनात गेलो. निवेदन दिल्यानंतर त्या पत्नी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या, तेव्हा त्यांना पोलिसांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यांना एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शहीदांच्या विधवा पत्नी मंजू जाट, मधुबाला, सुंदरी देवी आणि रेणू सिंग यांच्यासह त्यांनी नुकतेच विधानसभेच्या गेटवर निदर्शने करत असताना त्यांच्याशीही पोलिसांनी गैरवर्तन केले, असा आरोप त्यांनी केला. यानंतर या पत्नींनी राजभवनात जाऊन त्यांनी इच्छामृत्यूच्या परवानगीसाठी निवेदन दिले.