
आयुर्वेदिक दवाखान्यात काम विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टरनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कर्वेनगरमध्ये घडली आहे. संबंधित डॉक्टरने महिलेला तुम्हाला मसाज करता येतो का, मी तुम्हाला मसाज शिकवितो असे म्हणत महिलेचा विनयभंग केला.
ही घटना शुक्रवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी डॉ. मंदार रमेश अत्रे (वय 48, रा. अमृतसिद्धी सोसायटी, कर्वेनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगरमध्ये डॉ. मंदारचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. काल सकाळी एक महिला दवाखान्यात काम आहे का, असे विचारण्यासाठी गेली होती. त्यावेळी डॉ. मंदारने संधी साधून तुम्हाला मसाज करता येतो का, मी तुम्हाला मसाज शिकवितो, असे म्हणत महिलेच्या अंगाला स्पर्श केला.
त्यानंतर त्याने ड्रॉव्हरमधील पैसे दाखवून महिलेला दुपारी दीड वाजता येता का अशी विचारणा करीत विनयभंग केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.
































































