
पुण्यातील घोरपडे पेठ भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. हा परिसर आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे आता पुणे महानगर पालिकेने या परिसरात जास्तित जास्त चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या सगळ्यात डॉक्टरांना भाजप नगरसेवक अजय खेडेकर यांच्या मनमानी कारभाराचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांनी उघड्यावर रुग्णांचे नमुने घ्यावे यासाठी खेडेकर यांनी हट्ट धरल्याची तक्रार डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.
‘एखाद्या व्यक्तीची तपासणी ही निर्जन स्थळी करणे गरजेचे असते. जेव्हा आम्ही तपासणीसाठी व्यक्तीच्या नाकात किंवा तोंडात नमुने घेतली जाते ती स्टिक घुसवतो तेव्हा बऱ्याचदा ते शिंकतात किंवा खोकतात. अशा वेळी जर ती व्यक्ती कोरोनाग्रस्त असेल तर तिच्यातील कोरोनाचे विषाणू हे इतरत्र पसरतात. त्यामुळे ही चाचणी निर्जनस्थळी होणे गरजेचे असते. उघड्यावर तपासणी केल्यामुळे आजुबाजुच्या लोकांमध्ये हा विषाणू पसरू शकतो. त्यामुळे जी व्यक्ती बाधित नसेल तिलाही या विषाणूची बाधा होईल. म्हणूनच खेडेकर यांनी सांगितलेल्या प्रकारे आम्ही चाचणी करण्यास नकार देत होतो. मात्र त्यांनी न ऐकता सगळ्या रुग्णांना खुर्चीवर बसवून रांग लावली व आम्हाला चाचण्या करण्यास सांगितल्या’ असे भवानी पेठ परिसरात चाचणीसाठी गेलेल्या डॉक्टरांचे म्हणने आहे.
दरम्यान अजय खेडेकर यांनी आपण फक्त लोकांना एका रांगेत उभे केले होते. त्यांची चाचणी ही एका छोट्या हॉलमध्येच होत होती असे सांगितले आहे. तर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यानी या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगितले आहे. पुणे मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे.























































