
पेटत्या चितेवर पेट्रोल ओतल्याने भडका उडून दहा ते बारा जण होरपळ्याची घटना पुण्यातील कैलास स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेत दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ताडीवाला रस्ता परिसरातील रहिवासी दीपक प्रकाश कांबळे (वय 45) यांनी शनिवारी सकाळी सातच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ससून रूग्णालयातील वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह कैलास स्मशानभूमीत आणण्यात आला. चितेला अग्नी दिल्यानंतर प्लास्टिक कॅनमधील पेट्रोल चितेवर ओतण्यात आले. त्याच वेळी स्मशानभूमीतील ब्लोअर यंत्रणा सुरू करण्यात आली.
आधीच पेटलेल्या चितेवर पेट्रोल उडवण्यात आल्याने त्याचा भडका उडला. या भडक्याने तिथे अंत्यसंस्कारास उपस्थित असलेले दहा ते बारा जण होरपळले, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. या दुर्घटनेने होरपळलेले तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दलाकडून देण्यात आली.




























































