
बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनी जनजागृतीवर भर दिला आहे. त्यानुसार आता पोलीस पाटील, ग्रामसेवकांसह संबंधितांना समुपदेशनासह मार्गदर्शनाद्वारे मास्टरप्लॅन तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे गावोगावी अल्पवयीन मुलींच्या लग्नाला आडकाठी निर्माण होणार आहे. जिल्हा परिषदेत 8 जूनला महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख संबोधित करणार आहेत.
ग्रामीण भागात वाढते बालविवाह रोखण्यासाठी पोलिस प्रशासनासह जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लोकांच्या सहकार्याशिवाय बालविवाह रोखता येणे शक्य नसल्यामुळे त्यांचा सहभाग महत्वाचा आहे.
ग्रामसेवकांसह पोलीस पाटील यांना जबाबदारी देऊन बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, मागील पाच महिन्यांत पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ने 11 बालविवाह रोखले आहेत. त्याच धर्तीवर छुप्या पद्धतीने होणारे बालविवाह थांबवून कुटूंबियांची मानसिकता बदल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अज्ञानी पालकांमध्ये जनजागृती करून बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांह पोलीस पाटील दूत म्हणून काम करणार आहेत.
गरिबीसह कुटुंबातील मुलांच्या जादा संख्यामुळे अल्पवयीन मुलींचे लग्न लावून पालक जबाबदारी झटकत असल्याचे काही घटनांवरून दिसून आले आहे. दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जादा होत असल्यामुळे कुटूंबाकडून पालनपोषण व्यवस्थित होत नसल्याची मानसिकता काहीजणांची असते. त्यामुळेच 12 ते 15 वयोगटात मुलींचे लग्न लावून जबाबदारी झटकली जाते. मात्र, कमी वयात लग्न झाल्यामुळे मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासंदर्भात संबंधित पालकांची मनधरणी करून बालविवाह कसे रोखता येतील, याबाबतचे मार्गदर्शन केले जाणार आहे. मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 होईपर्यंत लग्न लावणे गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही बालविवाहाच्या कार्यक्रमांमध्येही लोक मोठ्या संख्येमध्ये सहभागी होउन सामाजिक बांधिलकी विसरत असल्याचे दिसून आले आहे.
डोळ्यादेखत लग्न लावण्याची तकलादू कारणे
ग्रामीण भागातील काही कुटूंबियामध्ये मुलीचे आई-वडिली किंवा आजी-आजोबा आजारी असल्याचे तकलादू कारण सांगून बालविवाह उरकले जातात. त्याशिवाय आर्थिंक परिस्थिती, मुलींचे व्यंग, सामाजिक अज्ञान, मुलीविषयी मनात न्यूनगंड बाळगून लग्न उरकले जात आहेत. मात्र, अल्पवयीन मुलीचे वाजत गाजत लग्न लावले जात असतानाही पोलिस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडून पोलिस प्रशासनाला माहिती दिली जात नाही. परिणामी अशा बालविवाहांचे पेव फुटले आहे.
बालविवाह रोखणे सामाजिक बांधिलकी असून त्यासाठी गावागावामध्ये जनजागृती होणे गरजेच आहे. त्या पार्श्वभूमीवर गावचे पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून जनजागृतीसह मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे. त्याशिवाय संबंधित कुटुंबीयांचे मार्गदर्शन करून जबाबदारीची जाणीव करून दिली जाणार आहे .
– डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.



























































