
>> प्रमोद जाधव
पुणे शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार आणि नालेसफाईची कामे अद्यापि पूर्ण झालेली नाहीत. अनेक भागांत वरवरची कामे झाली असून, प्रत्यक्ष कामे झाली नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. त्यात आठवड्यात झालेल्या पावसाने पूर्ण शहराची कोंडी होऊन पाणी साचणे, नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, असे प्रकार समोर आले. सिंहगड रस्ता भागाला पुराचा मोठा फटका बसत असलेल्या एकतानगर भागासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. आता जवळपास पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळादेखील पुणेकरांना प्रशासननिर्मित पुराचा धोका कायम असण्याची चिन्हे आहेत.
पुणे शहरात दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार आणि नालेसफाई आदी पावसाळापूर्व कामे केली जातात. यंदादेखील महापालिकेने ही कामे हाती घेतली. मात्र, सुमारे 20 मे पर्यंत सुमारे 70 टक्के कामे पूर्ण झाली. ही कामे 7 जूनपर्यंत पूर्ण केली जाणार होती. मात्र, मान्सूनपूर्व पावसात पालिकेच्या केलेल्या कामांचा फज्जा उडाला. शहरासह उपनगरांतदेखील जागोजागी पाणी साचले होते. पाणी साचण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. गेल्या वर्षी पावसाने हाहाकार केल्याने पालिकेच्या कारभारावर चिखलफेक झाली होती. त्यामुळे शहरात पाणी तुंबण्याच्या आलेल्या तक्रारींमध्ये महापालिकेने २०१ क्रॉनिक स्पॉटचा शोध घेतला होता. या २०१ स्पॉटनुसार प्राधान्यक्रम ठरवून पालिकेने कामे सुरू केली. मात्र, पहिल्याच पावसात सर्वत्र पाणी साचले. यामध्ये २०१ स्पॉटमध्ये काही केलेल्या कामांच्या ठिकाणी पाणी साचले की नाही, याचा शोध अद्यापि पालिकेला लागला नाही. पावसाळापूर्व सर्व कामे योग्य पद्धतीने होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, पाऊसात हा दावा फोल ठरत आहे. आता मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही पावसाळी तसेच पुढील काळात पावसाळी गटार आणि नालेसफाईची कामे कितपत पूर्ण होतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातदेखील पुणेकरांना स्वतःची काळजी स्वतःला घ्यावी लागणार आहे.
एकतानगरमधील नागरिकांचा जीव टांगणीला
शहर व खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे 25 जुलै रोजी मुठा नदीला पूर आला होता. त्यामध्ये एकतानगर भागातील अनेक सोसायट्या, दुकानांमध्ये पाणी घुसले होते. या ठिकाणी उपाययोजना करण्याचे ठरले होते. मंत्री, स्थानिक नेत्यांकडून नुसता फेरफटका मारला जात आहे. मात्र, महापालिका अथवा राज्य सरकारकडून अद्यापि तरी या भागासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे एकतानगर भागातील नागरिकांचाही यंदा जीव टांगणीला लागला आहे.
शहरात 201 ठिकाणांव्यतिरिक्त इतर किती ठिकाणी पाणी साचत आहे, याची माहिती सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून मागविली आहे. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाचे काम सुरू आहे.
गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी, महापालिका