पुण्यात वॉकीटॉकीचा गहाळपणा आला अंगलट, हडपसरचा पोलीस शिपाई निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामावर असताना एका पोलीस शिपायाला गहाळपणा चांगलाच अंगलट आला आहे. वॉकीटॉकी हरविल्याप्रकरणी संबंधित पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

प्रतीक सुरेश गायकवाड (नेमणूक- हडपसर पोलीस ठाणे) असे निलंबित करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. प्रतीक हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना 21 ऑगस्टला त्यांना फुरसुंगी बीटमार्शलची ड्युटी लावण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलिंग करताना रात्री दहाच्या सुमारास प्रतीक यांच्याकडून वॉकीटॉकी हरविल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात देण्यात आली.

शासकीय मालमत्ता असलेली वॉकीटॉकी काळजीपूर्वक सांभाळण्याची जबाबदारी प्रतीक यांची होती. मात्र, कोणतीही खबरदारी न घेता प्रतीकने वॉकीटॉकी हरविली. संबंधित वॉकीटॉकी धोकादायक संघटनेच्या हाती लागल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ शकतो. त्यामुळे पोलीस खात्यात असतानाही प्रतीक यांचे वर्तन अशोभनीय असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार त्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिले आहेत.

वॉकीटॉकीची काळजी घेणे गरजेचेच
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षातून काम पाहिले जाते. त्यासाठी प्रत्येक बीट मार्शलांसह, दामिनी पथक, पोलीस ठाण्यांकडे असलेल्या वॉकीटॉकीचा मोठा आधार आहे. त्याद्वारेच गोपनीय संदेश देउन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मात्र, गस्तीवर असतानाही वॉकीटॉकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच हडपसर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने वॉकीटॉकीच हरविल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.