कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात प्रशासन अॅक्शनमध्ये, पश्चिम महाराष्ट्रात मंगलकार्यालयांवर धडक कारवाई

 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये आले असून, ठिकठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात 248 मंगल कार्यालयांना नोटिसा बजाविल्या असून, 2300 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापुरात 27 मंगल कार्यालयांवर कारवाई करून 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सांगली, साताऱ्यातही मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नगरमध्ये 248 मंगल कार्यालयांना नोटिसा

नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज नगर शहरातील मंगल कार्यालये, तसेच महाविद्यालयांमध्ये धडक देऊन कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. नगर-संभाजीनगर महामार्गावरील ताज, आशीर्वाद व सिटी लॉन, तसेच गर्दीच्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांनी माहिती घेतली. काही लॉन्सचे गेट हे बाहेरून बंद करून आत लग्न समारंभाचा कार्यक्रम जोरदारपणे सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे या लॉन्सवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहरातील महाविद्यालयांमध्येही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश महाविद्यालय प्रशासनाला दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील अमृता लॉन्सला 20 हजारांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. दोन दिवसांत 248 मंगल कार्यालयांना नोटिसा देण्यात आल्या असून, दोन दिवसांमध्ये 2300 जणांवर कारवाई करून दोन लाख 30 हजारांचा दंड वसूल केल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

साताऱ्यात 93 जणांवर कारवाई

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता, सातारा जिल्हा प्रशासनाकडून हॉटेल, मंगल कार्यालये, आठवडा बाजार व दुकानांना भेट देऊन कोरोनाचे नियमभंग करणाऱ्या एकूण 93 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. परिविक्षाधीन जिल्हाधिकारी (वाई उपविभाग) मनीषा आवाडे यांनी खंडाळा शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये, आठवडा बाजार, दुकाने व विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत नायब तहसीलदार वैभव पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार, पोलीस गिरीश भोईटे, नलवडे, पोळ, नगरपंचायत कर्मचारी व पोलीस सहभागी झाले होते. शिरवळ व खंडाळा शहर मिळून 43 हजार 700 रुपये दंड वसूल झाला.

सांगलीत मनपा आयुक्तच उतरले रस्त्यावर

सांगलीत खुद्द आयुक्त नितीन कापडणीस हे रस्त्यावर उतरले. यात 172 लोकांकडून 35 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणील माने, वैभव कुदळे, पंकज गोंधळे, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, श्रीकांत मद्रासी यांच्यासह मनपाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

कोल्हापुरात 27 मंगल कार्यालयांना दंड

कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालयांना कोल्हापूर महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे. नियमांचे उल्लंघन केलेल्या 27 मंगल कार्यालयांवर रविवारी एकाच दिवशी कडक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. शहरातील फुलेवाडी, आपटेनगर, कळंबा, साने गुरुजी, क्रशर चौक, नाळे कॉलनी, बेलबाग, कसबा बावडा, ताराबाई पार्क, कावळा नाका, रेल्वे गुड्स आदी परिसरातील विविध मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी रणजित भिसे व इतर कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

…आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घातला मास्क

कोरोना आढावा बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीच मास्क न घालता ‘कोरोना बचावा’चे धडे दिल्याचे काल समोर आले होते. यासंदर्भात दैनिक ‘सामना’त वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. आजच्या कारवाईदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क घातल्याचे दिसून आले. शिवाय ‘मी मास्क घातला आहे,’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

इचलकरंजीत नवरीच आली पॉझिटिव्ह!

इचलकरंजी शहरातील घोरपडे नाट्यगृह परिसरात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या एका व्यक्तीच्या घरात लग्नकार्य होते. यामध्ये वधूचे वडील पॉझिटिव्ह होते. पाठोपाठ वधूचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. तरीसुद्धा या वधूचा लग्नसोहळा दणक्यात पार पडला. यासाठी दोन्हीकडील सुमारे दोनशे ते अडीचशे वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. वधूच पॉझिटिव्ह आल्यामुळे इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. या लग्नाला उपस्थित नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या