
गेल्या पंधरा दिवसांत पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून, मुंबईपेक्षा पुण्यात रुग्णवाढीचा वेग वाढत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सतरा हजारापर्यंत गेली आहे. कोरोनाचा वाढता कहर आणि पॉझिटिव्ह रुग्णांसाठी बेडसाठी करावी लागत असलेली पळापळ तसेच खासगी रुग्णालयांकडे बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयांच्या दारात रांगा लागल्या असून, प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 46 हजार 276 वर पोहोचली आहे. यात 31 हजार रुग्ण पुणे शहरातील आहेत. पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या साडेनऊ हजारांवर गेली आहे. शहराच्या बरोबरीने ग्रामीण भागातही रुग्ण वेगाने वाढत असून, साडेतीन हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्णवाढीचा वेग आणि त्यातही कोमारबीड रुग्ण मोठ्या संख्येने असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 16 हजार 796 पर्यंत गेली आहे. तर, संपूर्ण जिल्ह्यात 1083 जणांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे. आजपर्यंत 27 हजार 700 बरे होऊन घरी गेले आहेत. तरीदेखील 453 गंभीर रुग्ण असून, त्यांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
शरद पवार उद्या सोलापुरात
सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे रविवारी 19 जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेही उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील अधिकाऱ्यांनी ऐकला मुंबईचा अनुभव
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाच आज पुण्यातील अधिकाऱ्यांच्या समोर पाचारण केले.चहल यांनी त्यांच्या समोरच अधिकाऱ्यांचा वर्ग घेतला. मुंबई पुण्यापेक्षा आकाराने मोठी. झोपडपट्ट्या, उंच इमारती तरीदेखील जे मुंबईत शक्य झाले ते पुण्यात का होत नाही असा सवाल अधिकाऱ्यांना केला. चहल यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. आणि यशाची सूत्रे सांगितली.




























































