पुणे – भरदिवसा पिस्तूलाच्या धाकाने व्यापाऱ्याला लुटणाऱ्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटणाऱ्यां दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, 5 काडतुसे, दुचाकी, रोकड मिळून 83 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

प्रवीण उर्फ दादा सतीश पवार (वय 36,रा. मांजरी बुदू्रक) आणि संदीप उर्फ राम बापू वाघ (वय 31, रा. गोपाळपट्टी, मांजरी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जालाराम प्रभुजी प्रजापती (वय 55) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालाराम लाकूड खरेदी -विक्रीचे व्यापारी आहेत. ते 30 ऑक्टोबरला केशवनगरमधील दुकानात असताना दोघांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. त्यानंतर जालाराम यांच्या पोटाला पिस्तूल लावून आरोपींनी गल्ल्यातील 45 हजारांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी मुंढवा पोलिस तपास करीत असताना हा गुन्हा प्रवीण उर्फ दादा याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला मांजरी बुद्रूक परिसरात अटक केले.

चौकशीत त्याने साथीदार संदीप उर्फ रामच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिस त्याला पकडण्यासाठी मांजरीत गेले असता, तो पसार झाला. पोलिसांनी त्याला साताऱ्यातील भोसे गावातून अटक केली. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत भोसले, सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस कर्मचारी नाना भांदुर्गे, दीनेश राणे, दत्ता विभुते, दीपक कांबळे, महेश पाठक, स्वप्नाली आंबले, नीलेश पालवे यांच्या पथकाने केली.