
आंबील ओढ्याजवळ झालेल्या खुनाची उकल करण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे. गुन्हेगार मोठा कोण यातून वाद झाल्यामुळे तडीपार गुन्हेगारावर चाकूने वार करून खून करण्यात आला होता. खून करून पसार झालेल्या सराईताला दत्तवाडी पोलिसांनी म्हात्रे पुलाजवळ अटक केली.
अक्षय राम गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. सुरज भालचंद्र यशवद (वय 23 ) असे खून झालेल्या तडीपाराचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज यशवद हा विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. आरोपी अक्षय गायकवाड दरोडा आणि इतर गुन्ह्यातील आहे. शिक्षा भोगत असताना दोघांची ओळख कारागृहात झाली होती. अक्षय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातून बाहेर आला आहे. तर सुरज तडीपारीचा भंग करुन शहरात दाखल झाला होता. दोघेही रविवारी रात्री आंबिल ओढा परिसरात भेटले होते. त्यांच्यात बोलताना दोघांपैकी कोण मोठा गुन्हेगार यामुळे वाद झाला. त्यामुळे सुरजने अक्षयला तुझे जितके वय आहे, तितके माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. तु जास्त शहाणपणा करु नकोस असे म्हणत शिवीगाळ केली. यानंतर अक्षय तेथून रागाने निघुन गेला. काही वेळाने तो चाकू घेऊन बाहेर आला. त्याने रस्त्यातच सुरजला गाठून चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत सुरजला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.























































