पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकाला हैद्राबादमधून अटक, हॉटेलच्या चिठ्ठीमुळे गुन्हा उघडकीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीला धुणे धुत असताना नवऱ्याच्या खिशात सापलेल्या हॉटेलच्या बिलामुळे अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकाला समर्थ पोलिसांनी हैद्राबादमधून अटक केली. संबंधित मुलगी मुब्रा येथून 15 मेला बेपत्ता झाली होती. त्यासंदर्भात समर्थ पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.

अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईने हैद्राबाद येथे राहत असलेल्या तिच्या बहिणीला फोन करून माहिती दिली. त्यावेळी तिच्या बहिणीने स्वतःच्या नवऱ्याला अल्पवयीन मुलगी घर सोडून आली असून ती जीव देणार असल्याचे सांगितले. मात्र, संशय बळावल्यामुळे पीडित मुलीच्या आईने तिच्याकडे मोबाइल नसल्याचे सांगितले. त्यानंतर 19 मेला आरोपी काकाने अल्पयीन मुलीला मुब्रा येथील घरी नेउन सोडले. त्याने मुलगी डोंबविली रेल्वेस्थानक परिसरात मिळून आल्याचे सांगितले. त्यानंतर तो हैद्राबादला निघून गेला होता. दरम्यान, कपडे धुत असताना महिलेला नवऱ्याच्या खिशात पुण्यातील रास्ता पेठ परिसरातील हॉटेलची चिठ्ठी मिळाली होती.

चिठ्ठीनुसार नराधम काका संबंधित हॉटेलमध्ये अल्पवयीन पुतणीला पत्नी असल्याचे सांगून राहिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटूंबियाने मुलीकडे विचारपूस केली असता, काकाने अत्याचार केल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती दिली. त्यानुसार मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार समर्थ पोलिसांनी आरोपीला हैद्राबादमधून अटक केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, अर्जुन दिवेकर, नीलेश साबळे, नीलेश किरवे, शांताराम तळपे, शुभम देसाई यांच्या पथकाने केली.