पुणे – कर्वेनगर आणि वानवडीतील बंगल्यात चोरी, 31 लाखांचे दागिने लांबविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

शहरातील कर्वेनगर आणि वानवडी भागात चोरट्यांनी दोन बंगल्यातून तब्बल 31 लाखांचे सोन्याचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आले. कर्वेनगर भागात बंगल्यात झालेल्या चोरी प्रकरणात तक्रारदाराने नोकरांवर संशय व्यक्त केला आहे.

कर्वेनगर भागातील ज्ञानदीप कॉलनीत माधव फडके (वय 59,रा. पाचपाखाडी, ठाणे) यांचा बंगला आहे. फडके यांच्या बंगल्यात असलेल्या कामगारांनी 13 लाख 17 हजार 500 रुपयांचे दागिने लांबविले. फडके यांनी वारजे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नोकरांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक येवले तपास करत आहेत.

वानवडीत फेअर रोडवर असलेल्या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी शयनगृहातील तिजोरीवर ठेवलेल्या खोक्यामधील 18 लाख रुपयांचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.