मुलाला शाळेत प्रवेश न मिळाल्याने मंत्रालयात बॉम्बची पसरविली अफवा, पुण्यातून तरूणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून मंत्रालयात बॉम ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्याला मुंढवा पोलिसांनी सोमवारी रात्री घोरपडी परिसरातून ताब्यात घेतले. त्याने धमकीचा फोन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शैलेंद्र शिंदे ( रा. घोरपडी) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 30 मे 2021 रोजी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी त्याने दिली होती. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढविण्यात आला होता.

मंत्रालय परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती फोनवरुन देण्यात आली होती. त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचा मोठा फौजफाटही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला होता. धमकीचा फोन कोणी केला? याचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात होता. त्यानुसार संबंधित फोन पुण्यातून केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होती. आरोपी मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोरपडी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मुलाचे शाळेत अ‍ॅडमिशन झाले नसल्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास मरीन ड्राईव्ह पोलिस करीत आहेत.