Pune news – जे रक्षक, तेच असुरक्षित! गस्तीवरील पोलिसांना खडकीत बेदम मारहाण

पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनाच रात्रीच्या अंधारात टोळक्याने रस्त्यावर पाडून अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘कॉप्स 24’ अंतर्गत ड्युटीवर असलेल्या पोलिसांना थेट रस्त्यावर पाडून टोळक्याने मारहाण केल्याची घटना खडकी परिसरातील चर्च चौकात गुरुवारी रात्री घडली. संबंधितांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे पोलीसच असुरक्षित असतील तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जुनैद इकबाल शेख (वय – 27), नफीज नौशाद शेख (वय – 25), युनूस युसूफ शेख (वय – 25) आणि आरिफ अक्रम शेख (वय – 25) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, गोपाल देवसिंह गोठवाल (वय – 28) असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत गोठवाल यांनी फिर्याद दिली आहे. संबधित कर्मचारी ‘कॉप्स 24’ उपक्रमाअंतर्गत गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक 2मध्ये नियुक्तीला आहेत.

गुरुवारी रात्री फिर्यादी कर्मचारी आणि त्यांचे सहकारी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चर्च चौक परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी जुनैद आणि नफीज हे बेशिस्तपणे दुचाकी चालवीत असल्याचे आढळले. फिर्यादींनी त्यांना थांबवून विचारणा केली असता, जुनैदने पोलिसांशी अरेरावीची भाषा केली आणि ‘तू कोण विचारणारा?’ असा दम दिला.

दरम्यान, त्यांच्या पाठिमागून दुसरी दुचाकी घेऊन आलेले युनूस आणि आरिफ यांनीही पोलिसांशी वाद घातला. चौघांनी मिळून पोलीस शिपाई गोपाल यांना रस्त्यावर खाली पाडले आणि पाठीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. फिर्यादींच्या सहकाऱ्यालादेखील मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी गोठवाल यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. आरोपींचा शोध घेऊन काही तासांतच चौघांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

पोलीस कर्मचारी रात्रगस्तीवर होते. भरधाव चाललेल्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांना विचारणा केल्यानंतर संबंधितांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. मारहाणीनंतर पसार झालेल्या टोळक्याला अटक करण्यात आलेली आहे.

विक्रमसिंह कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे