
पुणे शहरातील बुधवार पेठेतील ‘आर. जे. ज्वेलर्स’ या दुकानातून तब्बल 4 लाख 74 हजार रुपयांची फॉर्मिंग ज्वेलरी (फॉर्मिंग सोने) चोरी करून कर्नाटकात फरार झालेल्या एका तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी कुठलाही सराईत गुन्हेगार नसून, इंजिनीअरिंग कॉ लेजचा टॉपर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे त्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले.
संबंधित तरुणाचे वय 19 वर्ष असून तो अरनहल्ली (जि. कोलार, कर्नाटक) येथील रहिवासी आहे. 6 जुलै रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. आरोपीने दुकानाच्या वरच्या मजल्यावरील वॉ शरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून फॉर्मिंग ज्वेलरी लंपास केली. चोरीनंतर दुसऱ्या दिवशी दुकानमालकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शोध सुरू केला.
पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या तपास पथकाने 230 ते 250 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा माग काढला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तो कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सलग चार दिवस सापळा रचून, स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीवर पाळत ठेवली. अखेर 16 जुलै रोजी गांधीनगर (कोलार) येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, अंमलदार आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.