
जेष्ठ दुकानदारासह त्यांच्या भावाचे अपहरण करुन तिघांना त्यांना धमकावून 1 कोटी 80 लाखांच्या दुकान प्रॉपर्टीच्या सह्या करुन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मित्रमंडळ चौकात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तिघांना अटक केले. गणेश बाबुराव यादव (रा. पर्वतीगाव), श्रीकांत वसंतराव तेरभाई (रा. भुसारी कॉलनी, कोथरुड ) आणि परेश अनिलकुमार भंडारी (रा. कोंढवा बुद्रूक ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र मोतीलाल पाखरे ( 32, रा. महर्षीनगर ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीलाल यांचे लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौकात मेसर्स कला नावाचे दुकान आहे. दुकान सुरु करण्यासाठी मोतीलाल यांनी श्रीकांत यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी ते आजारी पडले. त्याचा गैरफायदा घेउन श्रीकांत यांनी मोतीलाल यांना धमकाविले. 25 सप्टेंबरला मित्रमंडळ मोतीलाल यांच्यासह त्यांच्या भावाचे अपहरण करुन दुय्यम निबंधक कार्यालयात नेले. त्याठिकाणी श्रीकांतच्या मॅनेजर गणेश यादवने मोतीलाल यांच्याकडून कुलमखत्यार पत्रावर जबरदस्तीने सह्या करुन कुंटे चौकातील मेसर्स कला या 1 कोटी 50 लाखांच्या दुकानाचा ताबा घेतला. त्यांच्या दुकानातील महागडे फर्निचर, एलसीडी टीव्ही, कॅमेरे, सर्व माल मिळून 30 लाखांसह 1 कोटी 80 लाखांची फसवणूक केली.
दुकानमालकांचा आजारपणाचा फायदा घेउन तिघांनी त्यांचे अपहरण केले. मोतीलाला यांना धमकावून त्यांच्याकडून सह्या घेत दुकानासह इतर मालाची मिळून 1 कोटी 80 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे. – एस. एन. शेख, सहायक पोलीस निरीक्षक, स्वारगेट





























































