
पेट्रोल पंप व्यवस्थापकाने जमा झालेली 12 लाख 95 हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार मुंढवा परिसरातील एका पेट्रोल पंपावर घडला आहे. याप्रकरणी व्यवस्थापक श्रीहरी दामू बंडगर (वय 30) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंपाचे मालक श्रीनिवास जगताप (वय 26, रा. पद्मावती) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुंढवा परिसरात सिद्धार्थ पेट्रोल पंप असून पंपावर 14 कामगार असून तीन व्यवस्थापक काम करतात. आरोपी बंडगर जगताप यांच्या पेट्रोल पंपावर गेल्या काही वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. पंपावरील उधारीची रक्कम जमा झालेली होती. याबाबतची नोंद संगणकावर करण्यात आली होती. बंडगर याने संगणकीय नोंदीत फेरफार केला. उधारीपोटी जमा झालेली 12 लाख 95 हजार 333 रुपयांची रोकड गल्लयात ठेवण्यात आली होती. बंडगरने रक्कमेचा अपहार केला. गल्ल्यातील रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर जगताप यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. रोकड लांबवून जगताप पसार झाल्याचे निदर्शनास आले असून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने तपास करत आहेत.
भरदिवसा घरातून अडीच लाखांचा ऐवज चोरीला
भरदिवसा घराचे कुलुप तोडून चोरट्यानी कपाटातील रोकड आणि दागिने असा 2 लाख 30 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसरजवळील रामटेकडी परिसरात घडली. याप्रकरणी एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सदनिका बंद करून बाहेर पडली. खरेदी करून ती तासाभरानंतर घरी परतली. तेव्हा सदनिकेचे कुलुप तोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव तपास करत आहेत.
































































