पीएमपीएल बसचालकाचा खून करून पसार झालेल्या टोळीच्या चोवीस तासांमध्ये मुस्क्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या युनीट सहाला यश आले आहे. ऋषिकेश संजय बोरगावे (वय 31, रा. भेकराईनगर), अक्षय हनुमंत जाधव (वय 21, रा. फुरसुंगी, हडपसर) , प्रज्वल सचिन जाधव (वय 20, रा. काळेपडळ, हडपसर) , तुषार सूर्यकांत जगताप( वय 21, रा. गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे (वय 29) असे खून झालेल्याचे नाव आहे.
भांडण झालेल्या तरूणाला जामीन मिळवून दिल्याप्रकरणी टोळीला गौतमविषयी राग होता. त्यामुळे रविवारी टोळीने त्यांचा वार करून खून केला होता. कोणताही पुरावा मागे न ठेवता आरोपी पसार झाले होते. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितीन मुंढे, नितीन शिंदे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे यांनी तपास सुरू केला. त्यावेळी आरोपी ऋषिकेश बोरगावे आणि अक्षय जाधव यांनी गौतमचा खून केला असून, दोघेही धाराशिवमधील उमरगामध्ये असल्याची माहिती नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी प्रज्वल, तुषार, आकाश राठोड आणि इतर साथीदारांच्या मदतीने गौतमचा खून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक गणेश माने, एपीआय नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, सलीम तांबोळी, संदेश निकाळजे यांनी केली.






























































