
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्य़ांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात पिस्तूलांचा बाजार वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मागील नऊ महिन्यात पुणे शहरात 59 गावठी पिस्तुल आणि 109 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे पिस्तूलांचे वाढते पेव धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हौसेसाठी उच्चभ्रू वर्गातील नागरिक पिस्तुल बाळगण्यासाठी कायदेशीर अर्ज करत आहेत. दुसरीकडे मात्र अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्य़ांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यानुसार अवैध धंदे आणि पिस्तूल बाळगणाऱ्य़ाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने झाडाझडती सुरु केली आहे.
मागील एक महिन्यात पुणे पोलिसांनी अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्य़ा 9 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसे असा 4 लाख 44 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
चंदनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात आरोपी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे दोन गावठी पिस्तुल एक गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसे मिळून आली. समाधान लिंगप्पा विभुते (वय 28) आणि गोपाल रमेश मुजमुले (वय 21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तब्बल 59 पिस्तूल आणि 106 काडतुसे
शहरातील विविध भागातून गुन्हे शाखेने जानेवारी ते आतापर्यंत अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 41 गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार 52 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 59 गावठी पिस्तुलसह 106 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यात पिस्तूलाचा वापर वाढला असल्याचे दिसून आले आहे.
बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्य़ाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसर देशी विदेशी पिस्तूलांची खरेदी विक्री करण्यासाठी शहरात येणाऱ्य़ांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आले आहे. त्यांच्या माहितीनुसार इतरांचीही माहिती घेतली जात असून तपास केला जात आहे. – बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा




























































