पुणे – पूर्ववैमनस्यातून तरुणावर कुऱ्हाडीने वार करून केला खून

पूर्ववैमनस्यातून दोघाजणांनी तरुणावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना औंध परिसरात घडली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. क्षितिज वैरागर (वय 22, रा.औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्षितिज वैरागर आणि दोघा आरोपींमध्ये पूर्वीचे वाद होते. त्यामुळे रागातून दोघांनी आज सात वाजण्याच्या सुमारास क्षितिज वस्तीत थांबला असताना त्याच्यावर हल्ला केला. कुऱ्हाड घेऊन आलेल्या आरोपींनी क्षितिजच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याचा खून केला. भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या