
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेले संचारबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दररोज रात्री 10 ते पहाटे पाचपर्यंत असलेली संचारबंदी शनिवारपासून (1 ऑगस्ट) मागे घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर मार्च महिन्यापासून शहरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर वाहतूकबंदीसह संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. त्यानंतर जुनमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले. त्याशिवाय शहरातील व्यवहार काळजी घेऊन सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जून महिन्यात संचारबंदीचे आदेश काहीसे शिथिल करण्यात आले. त्यानंतर जुलै महिन्यात शहरात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढली.
त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात रात्री 10 ते 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. याकालावधीत विनापरवानगी संचार करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, विनाकारण भटकंती, विना मास्क प्रवास, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणायाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र, आता रात्रीच्या संचारबंदीचे आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी दिली आहे.





























































