पुणे – जिल्ह्यात सायबर सुरक्षा दिंडीचा नारा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायबर जनजागृतीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अनोखा प्रयोग सुरू केला आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील गावोगावी ‘सायबर सुरक्षा दिंडी’ काढुन जनजागृती केली जाणार आहे. विशेषतःफसवणूक टाळण्यासाठी विविध पथनाट्ये, सामाजिक संदेश, भित्तीपत्रकांद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. त्याशिवाय नागरिकांना शपथ देउन सायबर क्राईम रोखण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सुरक्षा दिंडीचा उप्रकम हाती घेण्यात आला आहे. त्याद्वारे ऑनलाईनरित्या होणारी सायबर फसवणूक कशी टाळता येईल याविषयी माहिती दिली जाणार आहे.

सायबर चोरट्यांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. बँकेतून बोलतोय, एलआयसीमधील तुमची पॉलिसी अपडेट करायची आहे, बँक अ‍ॅप अपडेट करावे लागणार, मोबाइल बॅलन्स मिळवा, अमुक-तमूक लॉटरी विभागातून बोलत असल्याची बतावणी करून नागरिकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सायबर सुरक्षा दिंडीद्वारे नागरिकांची जनजागृती करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. जिल्ह्याभरात सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांची माहिती काढून डेटा संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याद्वारे सायबर चोरट्यांची मोडस ऑपरेंडी, सर्वाधिक आमिष दाखवून फसवणूकीची पद्धत तपासली जात आहे. त्याशिवाय गावोगावी सायबर सुरक्षा दिंडी काढून मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे.

गावोगावी मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वाढली असून सायबर चोरट्यांच्या आमिषाला भुरळून अनेकांकडून अनावश्यक लिंक उघडणे, बँकेची गोपनीय माहिती शेअर करणे, मोबाइलवर आलेला ओटीपी दिला जात आहे. त्यामुळे सायबर चोरट्यांचे फावले असून अवघ्या काही मिनीटांमध्ये नागरिकांच्या बँकखात्यातून रक्कम कमी करून गंडा घातला जात आहे. त्याशिवाय अनोळखी मैत्री, अश्लील व्हिडिओ कॉलद्वारेही लुटीच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची सायबर जनजागृती आवश्यक असल्याचे लक्षात येताच, पुणे ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेत सायबर सुरक्षा दिंडीचा उपक्रम हाती घेतला आहे. उपक्रमाची सुरूवात खेड पोलीस ठाण्यापासून करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे, एपीआय सचिन कांडगे, अतुल डेरे, राहुल किर्वे, भारत मोहोळ, सायबर तज्ञ योगेश ठाणगे यांच्यावतीने महात्मा गांधी महाविद्यालयात जनजागृती करीत फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना सायबर शपथ देण्यात आली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून पथनाट्यांचे सादरीकरण

सायबर फसवणूक टाळण्यासाठी पथनाट्यांद्वारे नागरिकांची जनजागृती केली जाणार आहे. गावातील मुख्य चौका, शाळा-महाविद्यालय परिसर, गर्दीची ठिकाणे, एसटी स्थानक, मध्यवर्ती ठिकाणांवर प्रयोगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी दुसर्‍या टप्प्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडूनही पथनाट्ये सादरीकरण करण्यात येणार आहे. सायबर फसवणूक टाळता येण्यासाठी विविध सामाजिक संघटना, महाविद्यालये, नागरिकांचा सहभाग वाढविणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

गावोगावी दिली जाणार ही सायबर शपथ

‘मी अशी शपथ घेतो की, मी मोबाईलवर येणार्‍या अनावश्यक लिंकवर कधीही क्लिक करणार नाही. माझा बँकेचा पासवर्ड आणि प्राप्त ओटीपी कोणालाही सांगणार नाही. अनोळखी क्रमांकावरून येणारे व्हिडीओ कॉल, नकली लोन अ‍ॅपपासुन सावध राहुन माझ्या सर्व मित्र परिवाराला परावृत्त करेन. मला अशी खात्री आहे की, आज केलेली चांगली सुरुवात माझ्या संपुर्ण आयुष्याला समृध्द बनवेल !

पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्येही सायबर फसवणूकीचे गुन्हे वाढत चालले आहेत. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक असून त्याअनुषंगाने सायबर सुरक्षा दिंडीद्वारे गावोगावच्या नागरिकांचे पथनाट्यांद्वारे प्रबोधन केले जाणार आहे. त्याशिवाय सायबर फसवणूक टाळण्यासाठी शपथ घेउन एकमेकांना जागृत करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. सायबर सुरक्षा दिंडीची सुरूवात झाली असून ठिकठिकाणी मार्गदर्शन, जनजागृती, संदेश देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.
अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण