पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळयात, कोरोनात कामधंदा नसल्यामुळे चोरल्या 14 सायकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cycle

कोरोना कालावधीत कामधंदा नसल्यामुळे पैशांची अडचण सोडविण्यासाठी एका सायकलचोर आशिकला हडपसर पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. संबंधित चोरट्याने शहरातील विविध भागातून सायकल चोरी केल्या होत्या. मात्र, हडपसर पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून सायकलचोर तरूण सुटला नाही. त्याच्याकडून 1 लाख 55 हजार रूपयांच्या 14 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आशिक जीवन आले (वय 24, रा. मुंढवा, मूळ-दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

फिटनेस वाढविण्यासाठी शहरात अनेकांकडून महागड्या सायकली खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. नेमकी तीच संधी साधून कोरोना कालवाधीत कामधंदा नसल्यामुळे एका चोरट्याने सायकल चोरण्याची नवी शक्कल लढविली. त्यानुसार गार्डननजीक सायकलवर येणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेउन त्यांच्या सायकली चोरण्यास तरुणाने सुरूवात केली. त्यानुसार त्याने हडपसर परिसरातील ग्लायडिंग सेंटर, भोसले गार्डन, मगरपट्टा सिटी, मांजरी, हडपसर परिसरातून सायकली चोरण्याचे सत्र कायम ठेवले. 19 जुलैला एका तरूणाची मांजरी बुद्रूक परिसरातून सायकल चोरीला गेली होती. त्यासंबंधी पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमंलदार समीर पांडुळे आणि प्रशांत दुधाळे यांना सायकल चोर तरूणाची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आशिक आले याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हडपसर, चंदननगर परिसरातून 14 सायकली चोरल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, एपीआय हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांनी केली.