पुणे – शहरात वादळी वाऱ्यामुळे 31 ठिकाणी झाडपडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात वादळी वारा आणि पावसामुळे वेगवेगळ्या भागात 31 ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झाले नाही. काही ठिकाणी वाहनांवर झाडे कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले. किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळामुळे शनिवारी (दि. 15) सायंकाळपासून सोसाट्याचे वारे वाहत आहेत. रात्री नऊनंतर शहरात वेगवेगळ्या भागात पाऊस झाला. पाऊस तसेच जोरदार वाऱ्यामुळे मध्यभागासह उपनगरातील वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरात निर्बंध लागू असल्याने फारशी वाहने रस्त्यावर नाहीत. झाडे कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

वादळी वाऱ्यामुळे कोंढवा बुद्रुक येथील खडी मशीन चौक, सिंहगड रस्त्यावर सनसिटी, आनंदनगर, कोथरूडमधील गुजरात कॉलनी, मुकुंदनगरमधील रांका हॉस्पिटलजवळ, येरवड्यातील इंदिरानगर वसाहत, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, हडपसरमधील ससाणेनगर, माळवाडी, उंड्री, कात्रज, धनकवडी, दत्तनगर, प्रभात रस्ता, सेनापती बापट रस्ता, सारसबाग, पुणे स्टेशन परिसरातील लडकतवाडी, सहकारनगरमधील तुळशीबागेवाले कॉलनी, कोरेगाव पार्क, सेनादत्त पेठ, शिवदर्शन, कसबा पेठेतील तांबट हौद, नवी पेठ, गंज पेठेत झाडे कोसळली. शहरात वादळी वारे वाहत असल्याने झाडाखाली शक्यतो थांबू नये. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले.