सियाचीनमध्ये विराजमान होणार दगडूशेठ गणपती! 22 मराठा बटालियनकडे श्रींची प्रतीकात्मक मूर्ती सुपूर्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात उंचावरची युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये आता ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष ऐकू येणार आहे. येथील सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीची प्रतीकात्मक मूर्ती विराजमान होणार आहे.

सोमवारी मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात लष्करातील 22 मराठा बटालियनच्या सैनिकांकडे ‘श्रीं’ची 2 फुटांची प्रतीकात्मक मूर्ती सुपूर्द करण्यात आली. सियाचीनमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदुस्थानी सैनिक सीमेचे रक्षण करतात. आता थेट तेथेच गणपती मूर्तीची स्थापना झाल्यामुळे सैनिकांना ऊर्जा मिळणार आहे.

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱया मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये सर्वधर्म स्थळावर करण्याची इच्छा 22 मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव यांनी ट्रस्टकडे व्यक्त केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन ट्रस्टने ‘श्रीं’ची हुबेहूब प्रतीकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. ही मूर्ती पुण्यातील मूर्तिकार भालचंद्र देशमुख यांनी साकारली आहे.

सोमवारी ही मूर्ती बटालियनच्या माऊली रेडेकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, विजय धनगर या जवानांकडे देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, प्रकाश चव्हाण, माऊली रासने, मूर्तिकार भालचंद्र देशमुख, सिद्धार्थ गोडसे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.