
मोठमोठ्या हंड्या…डीजेच्या तालावर तरूणांच्या गोविंदा…गोविंदाच्या घोषणा…पाण्याचा मारा झेलत हंडी फोडण्यासाठी गोविंदाची लगबगीचे चित्र कोरोनामुळे यंदाही दिसणार नाही. मात्र, त्यामुळे मंडळांचा जल्लोष कमी झालेला नाही. सामाजिक जाणीव ठेउन गोरगरिबांना मदत करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. त्याशिवाय शहरात दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. त्यानुसार मध्यवर्ती शहरांसह उपनगरांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त हद्दीत पेट्रोलिंग करणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना रूग्णसंख्येचा वाढता आलेख लक्षात घेउन राज्य सरकारने मंगळवारी होणाऱ्या दहिहंडी उत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्यास मुंबईसह अन्य काही ठिकाणी काहींनी विरोध दर्शवून दहिहंडी उत्सव साजरा करण्याची भुमिका घेतली आहे. मात्र, पुणे पोलिसांनी दहिहंडी उत्सव मंडळांना याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यास मंडळांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, दरवर्षी पुण्यात हुतात्मा बाबू गेणू आणि सुवर्णयुग तरूण मंडळाच्या दहीहंडी उत्सव नागरिकांसाठी पर्वणी असते. त्यासाठी मुंबई, बारामती, दौंड, नगर, नाशिक परिसरातून गोविंद पथक दहीहंडीसाठी शहरात दाखल होतात. बक्षीसांची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गोविंदाकडून दहीहंडी फोडण्यासाठी पुण्याला प्राधान्य दिले जात होते. मात्र, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही गोविंदाच्या आनंदावर विजरण आहे.
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी मंडळांकडून घेतली जाणार आहे. दहीहंडी मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, कोठेही गर्दी न करता दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे टाळावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी केले आहे. मंडळांनी नियमांचे उल्लंघन करू नये, समाजfिहताच्यादृष्टीने ते गरजेचे आहे. गर्दीसह परस्पर स्पर्शातून कोरोनाच्या उद्रेकाचा धोका लक्षात घेऊन सर्वांनी नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.” दहीहंडी मंडळांशी पोलिसांकडून संपर्क साधण्यात आला आहे. त्यांना समजावण्याचेही काम पोलिसांकडून करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूद्ध कडक निर्बंध घातले जाणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी दिली आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्यावतीने साजरा करण्यात येणारा मोठा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. गणपती मंदीरात प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्यात येणार आहे. त्याशिवाय दहीहंडीसाठी एकत्रित करण्यात येणारी रक्कम गोरगरिबांच्या किराणा माल देण्यासाठी खर्च करण्याचा ठराव मंडळाने केला आहे. त्यानुसार सामाजिक हेतूने काम करण्याचा मंडळाचा ध्यास कायम आहे.
– बाळासाहेब मारणे, अध्यक्ष हुतात्मा बाबू गेणू दहीहंडी मंडळ
कोरोना संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने यंदाही मंडळाच्यावतीने खबरदारी घेउन दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. – अशोक गोडसे, अध्यक्ष, सुवर्णयुग तरूण मंडळ






























































