
मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच बसवण्यात येणार आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापासून या कोचची सुरुवात होणार असून रविवार 8 ऑगस्ट पासून बुकिंग सुरू होणार आहे. हा पुणे-मुंबई मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे
रेल्वेने ट्रेन क्रमांक 02123/02124 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये 15 ऑगस्ट 2021 पासून एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या मार्गावर जोडण्यात आलेला हा दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे. या मार्गावर पहिल्यांदा गाडी क्रमांक 01007/01008 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई -पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये 26 जून 2021 पासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे.
या मार्गावरील प्रवाशांची मागणी लक्षात घेता आणि डेक्कन एक्स्प्रेस मध्ये लावण्यात आलेल्या पहिल्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता, आता डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्येही एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या ट्रेनची संरचना एक व्हिस्टाडोम कोच, 4 वातानुकूलित चेअर कार, 9 सामान्य द्वितीय आसन श्रेणी, 2 द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 पॅन्ट्री कार.
आरक्षण – नवीन जोडल्या जाणाऱ्या व्हिस्टाडोम कोच मधील विशेषच्या ट्रेन क्रमांक 02123/02124 चे बुकिंग 8 ऑगस्ट 2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
कन्फर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानादरम्यान कोविड 19शी संबंधित सर्व नियमांचे व एसओपीचे पालन करावे लागेल.





























































