
शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदारसंघ युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपींना मोक्का लावण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे.
शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवदेन दिले. यावेळी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, हडपसर शहरप्रमुख समीर तुपे, गजानन थरकुडे, पृथ्वीराज सुतार उपस्थित होते.
मारटकर हत्या प्रकरणाचा तपास जलदगतीने करावा यासाठी आज शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आयुक्तालयामध्ये भेट घेतली. हत्याप्रकरणी पोलीस तपासात कुठलीही हयगय न करता दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिता गुप्ता यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले.

दरम्यान, दीपक मारटकर हत्याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.





























































