धायरी फाट्यावर भरदिवसा कोयताधार्‍यांचा धूडगुस, एकावर कोयत्याने वार, तरूण गंभीर जखमी

सिंहगड रोड भागातील धायरी फाट्यावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास तीन ते चार जणांच्या टोळक्याने एका तरूणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. घटनेत तरूणाला दहा ते बारा टाके पडले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेत मनोज सुर्यवंशी नावाचा तरूण जखमी झाला आहे. त्याला दादा मोघे, श्रावण हिरवे, बंटी कांबळे, साहिल चिकणे यांच्याकडून मारहाण झाली असून यातील मोघे आणि हिरवे यांना ताब्यात घेतल्याचे सिंहगड रोड पोलिसांकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सिंहगड रोड कडून धायरीकडे येणार्‍या मुख्य चौकातच ही घटना घडली. पुर्वीच्या वादातून हा प्रकार घडला. येथील एका इमारतीच्या खाली चहाच्या टपरी जवळ सुर्यवंशी थांबलेले होते. त्यावेळी तेथून जाणार्‍या तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ, मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने वार केले. यात सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत पीडित व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांची घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर यातील दोघांना तात्काळ ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ निरीक्षक महाजन यांनी सांगितले.