
दारू पिण्यास बसल्यानंतर झालेल्या वादातून तिघांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. दरम्यान येरवडा भागातील खुनाचे सत्र काही थांबत नसल्याचे दिसून आले आहे. फैय्याज शेख (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फैयाज आणि त्याच्या ओळखीतील तिघे मित्र आंबेडकर शाळेच्या मैदानात दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यामुळे वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर तिघांनी मिळून फैयाजच्या डोक्यात दगड मारून खून केला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. काही वेळानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.































































