
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचा भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणातील दोषमुक्तीचा अर्ज मुंबईतील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणात तत्कालिन महसूल मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने खडसे यांना क्लिनचिट दिली होती. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू करण्यात आला होता. न्यायालयाने पुनर्तपासास परवानगी दिल्यानंतर तिघांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड कमी किमतीत खरेदी केल्याच्या आरोपावरून खडसे यांना ईडीने समन्स बजावले होते. तसेच त्यांच्याविरुद्ध ईसीआयआर दाखल केला. एवढेच काय तर ईडीने एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी तसेच जावई गिरीश चौधरी व अन्य काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज केला. विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर याप्रकरणावर नुकतीच सुनावणी झाली. दरम्यान न्यायाधीशांनी आरोप निश्चित करण्यासाठी 18 डिसेंबर रोजी प्रकरण तहकूब केले असून सुनावणीला तिन्ही आरोपींना उपस्थित राहावे लागणार आहे.





























































