क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष, पुण्यातील ज्येष्ठाची 1.32 कोटी रुपयांची सायबर फसवणूक

पुणे शहर सायबर पोलिसांनी 62 वर्षांच्या खराडी येथील रहिवाशाच्या तक्रारीवरून 1.32 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत फॅशन डिझायनर असल्याचे भासवणाऱ्या महिलेने आणि परदेशी क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजचे प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने मिळून आपल्याला गंडा घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. टेथर (USDT) या अमेरिकन डॉलरशी संलग्न असलेल्या क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक केल्यास अत्यंत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून आरोपींनी वेगवेगळ्या टप्प्यांत पैसे उकळल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराला सुरुवातीला फेसबुकवरून एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती स्वतःला बुटीक चालवणारी फॅशन डिझायनर असल्याचे सांगत होती. ऑनलाईन संवादातून तिने क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमधून मिळणाऱ्या प्रचंड नफ्याबाबत माहिती देत गुंतवणुकीसाठी राजी केले. त्यानंतर तिने सेशेल्सशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या एका परदेशी क्रिप्टो एक्स्चेंजचा हिंदुस्थानातील कार्यकारी अधिकारी म्हणून दुसऱ्या व्यक्तीची ओळख करून दिली. या व्यक्तीने डिजिटल चलन व्यवहारातील आपली तज्ज्ञता सांगत गुंतवणूक अधिक सुरक्षित असल्याचा विश्वास निर्माण केला.

यानंतर तक्रारदाराला एका मोबाईल अ‍ॅपवर खाते उघडण्यास सांगण्यात आले. तपास अधिकाऱ्यांच्या मते हे अ‍ॅप बनावट असण्याची शक्यता आहे. पुढील काही आठवड्यांत 23 पेक्षा अधिक व्यवहारांद्वारे तक्रारदाराकडून मोठ्या रकमा वळवण्यात आल्या. अ‍ॅपवर मात्र त्याची गुंतवणूक वाढून 4 कोटींपेक्षा जास्त झाल्याचे खोटे चित्र दाखवण्यात आले. मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी आधी 15 टक्के कर भरावा लागेल, अशी मागणी केली. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती उपआयुक्त पोलीस विवेक मिसाळ यांनी दिली. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या गुन्ह्याची कार्यपद्धती अलीकडेच समोर आलेल्या आणखी एका प्रकरणाशी जुळणारी आहे. त्या प्रकरणात पुण्यातील एका वरिष्ठ टेलिकॉम अधिकाऱ्याची टेथरमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून आणि बनावट परदेशी क्रिप्टो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.