
महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष भेटीगाठी आणि घरोघरी पत्रके वाटप सुरू आहे अशातच कर्वेनगरमधील एका घरमालकाने आपल्या घराबाहेर लावलेल्या पाटीने निवडणूक लढवू इच्छिणाऱयांची चांगलीच गोची केली आहे.
कर्वेनगर येथील प्रभाग क्रमांक 30मधील एका घराबाहेर ही अनोखी पाटी झळकली आहे. ‘या घरात 22 मतदार आहेत. त्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तरी कोणी इच्छुक उमेदवार मदत करणार असेल तरच त्यांनी बेल अथवा दरवाजा वाजवावा. – हुकमावरून घरमालक,’ असा मजकूर या पाटीवर लिहिण्यात आला आहे.
निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून इच्छुकांनी मतदारांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणी देवदर्शन, कोणी महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’, तर कोणी सहलींचे आयोजन करत आहे. मात्र कर्वेनगरमधील या पाटीने थेट आर्थिक मदतीची विचारणा करून नेत्यांच्या ‘प्रलोभन’ संस्कृतीवर उपरोधिक टीका केल्याचे बोलले जात आहे. ही पाटी म्हणजे राजकीय पक्षांच्या दिखाऊ रणनीतीला पुणेरी शैलीत दाखवलेला आरसा म्हणावा लागेल.
मुंबई वाचवण्यासाठी आणि रक्षणासाठी लढले पाहिजे
महाराष्ट्रावर, मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार मांडली.
नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली. मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे. मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे. त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी लढावे लागणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद
मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.




























































