
मुंबईहुन पुण्याच्या दिशेने आलेल्या एका मोटारीला अचानक आग लागल्याची घटना आज रात्री दहाच्या सुमारास गणेश खिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात घडली. चालकाने मोटार वेळीच बाजूला घेऊन खाली उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
हडपसर परिसरातील कापड व्यावसियक मुंबईत कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते पुण्याच्या दिशेने येत होते. रात्री दहाच्या सुमारास विद्यापीठ चौकात चालकास गाडीतून जळाल्याचा वास आला. त्यामुळे त्याने गाडी बाजूला घेऊन पाहणी केली. त्यावेळी गाडीने आचानक पेट घेतला. अवघ्या काही वेळात गाडीच्या समोरील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
घटनेची माहिती मिळताच औध अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मोटारीवर पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. मुंबईहून येताना वाहतूक कोंडीत गाडी बराच वेळ अडकली होती. त्यामुळे गाडी गरम झाल्यामवळे आग लागली असल्याची माहिती संबंधित कापड व्यवसायिकाने दिली आहे.




























































