गौतम पाषाणकर सापडले, गूढ मात्र कायम; कुटूंबियामुळे आत्महत्या टाळल्याची दिली माहिती

कुटूंबियांचा विचार मनात आल्याने आत्महत्येच्या विचारापासून मतपरिवर्तन झाल्याची माहिती उद्योगपती गौतम पाषाणकर यांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी मांगवारी त्यांचा जयपूरमध्ये शोध घेतल्यानंतर आज सकाळी त्यांना विमानाने पुण्यात आणण्यात आले. पाषाणकर सापडले तरी मात्र, त्यांच्या गायब होण्याचे गूढ कायम आहे.

पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेस त्यांनी मागील 34 दिवसांच्या प्रवासाचा उलगडा केला. यावेळी सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पाषाणकर यांचे पुत्र कपिल पाषाणकर उपस्थित होते.यांचा

पाषाणकर यांनी 21 ऑक्टोबरला सुसाईट नोट चालकाकडे देऊन घर सोडले होते. त्यानंतर पोलिसांची सहा पथके त्यांच्या मागावर होती. पाषाणकर यांचे अपहरण झाले नसून ते सुरक्षीत असल्याचे पोलीस ठामपणे सांगत होते. पाषाणकर यांचे कोल्हापूर येथील एका हॉटेलाच्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने तसेच त्यांनी क्रेडीट व डेबीट कार्डचा वापर केला नसल्याने तपास थांबला होता. त्यानंतर मंगळवारी मात्र पाषाणकर जयपूरला असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांना आज पुण्यात आणण्यात आले.

स्वारगेट रिक्षाप्रवास ते जयपूर हॉटेल

पाषाणकर म्हणाले, मागील काही महिन्यापासून व्यवसायातील उलाढाल थांबली होती. त्यामुळे मानसिक कोंडी झाली होती. ती सुधारण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र त्यातून बाहेर पडून न शकल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. स्वारगेटला रिक्षाने गेल्यावर खासगी बसने थेट कोल्हापूर गाठले. सोबत 80 हजाराची रोकड होती. कोल्हापूरवरुन कोईम्बतूर, बंगलोर, तिरुपती बालाजी, कन्याकुमारी, जैसलमेर असा प्रवास करत थेट जयपूरला पोहचलो. आज (बुधवारी) जयपुर शहर सोडून निघणार होता. मात्र पोलिसांनी आदल्याच दिवशी मला गाठले. या कालावधीत कुटूंबाशी कोणताही संपर्क केला नाही. कुटूंबियाबाबत सतत विचार येउ लागल्यामुळे मनामध्ये आलेला आत्महत्येचा विचार नाहीसा झाला.

आपली प्रतिक्रिया द्या