गुंडाच्या वाढदिवसाचा विमानतळ भागात धांगडधिंगा, सेलिब्रेशनसाठी केकबरोबर हत्यारही व्हिडिओ व्हायरल

रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी मध्यरात्री बर्थडे पार्टीसाठी एकत्र येत हातात लाठय़ा-काठय़ा आणि धारदार हत्यारे घेऊन गुंड निखिल कांबळेचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार विमानतळ भागातील स्कायमॅक्स बिल्डिंगमध्ये शनिवारी (दि. 2) रात्री घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने 10 रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह एकूण 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आकाश वसंत कंचिले, निखिल मधुकर कांबळे, फिरोज अहमद शेख, सोहेल सलीम कनुल, अखलाख शेख, वनराज जाधव, आकाश ऊर्फ टक्या मिरे, राहुल घाडगे, साहिल कांबळे, आतिफ़ ऊर्फ भांडा शेख आणि स्कायमॅक्स बिल्डिंगचे सुरक्षा व्यवस्थापक विजय अंबुरे आणि ईश्वर भोंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ आढळून आला. या व्हिडीओमध्ये काही तरुण बेसमेंटमध्ये मोठय़ा संख्येने एकत्र येऊन नाचताना आणि वाढदिवस साजरा करताना दिसत होते. वाढदिवस साजरा करणारा व्यक्ती निखिल कांबळे असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सुरक्षा व्यवस्थापकांवरही गुन्हा दाखल

या घटनेवेळी उपस्थित असलेल्या सुरक्षा व्यवस्थापकांनी पोलिसांना त्वरित माहिती न दिल्याने त्यांच्या भूमिकेवरही संशय निर्माण झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असूनही त्यांनी ती जाणीवपूर्वक लपवली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.