पुण्यात किरकोळ गुटखा विक्रेत्यांवर छापे, आठ जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात छुप्या पध्दतीने किरकोळ गुटखा विकणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु केले आहे. विमानतळ व येरवडा भागात किराणा किंवा पान टपरीवर कारवाई करून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

जनरल स्टोअर्समध्ये छुप्या पध्दतीने गुटखा विक्री करणाऱ्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. गौरीशंकर माळी (रा.लोहगाव) असे त्याचे नाव असून त्यांच्याकडे 4 हजार 312 रुपयांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखू मिळून आली. लोहगाव येथील अलका बेकरीमध्ये गुटखा विकताना अस्लम अन्सारी (रा.लोहगाव) याला अटक केली आहे. त्याच्याकडे 1 लाख 12 हजार 326 रुपयांचा गुटखा आढळला. खांदवेनगर येथील वेदिका सुपर स्टोअर्समध्ये 2 हजार 220 रुपयांचा गुटखा विकताना आतिष केदारी(रा.खांदवेनगर) याला अटक करण्यात आली आहे.

घरामध्ये 5 हजार 841 रुपयांचा गुटखा विक्री करणाऱ्या युसूफभाई पालकर (वय 55,रा.येरवडा) यालाही अटक करण्यात आली आहे. येरवड्यातील जवाननगरमध्ये वेद प्रोव्हिजन स्टोअर्समध्ये 19 हजार 820 रुपयांचा आढळून आला. याप्रकरणी मांगीलाल जाट (वय 30,रा.येरवडा) याला अटक करण्यात आली. गांधीनगर येथील मुमताज जनरल स्टोअर्समध्ये 45 हजार 879 रुपयांचा प्रतिबंधिक गुटखा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील भारत बेकरीचा चालक सिराज समी शेख याला 56 हजार 165 रुपयांचा गुटखा विकताना अटक केली आहे. त्याशिवाय लुकमान शरिफ शेख (रा.येरवडा) याला अटक करुन त्याच्या घरातून 1 हजार 734 रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. विश्रांतवाडीतील राजीव गांधीनगरमधील अजर शेखला(वय 31,रा.येरवडा) त्याच्या पानटपरीत 540 रुपयांचा गुटखा आढळून आला.