
भावाच्या औषधोपचारासाठी घेतलेल्या 30 हजारांवर तब्बल 1 लाख 29 हजारांचे व्याज मागत कुटूंबातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला युनीट एकने जेरबंद केले. न्यायालयाने 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सतिश बन्सिलाल भाटी (वय 54 रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फिर्यादी तरूणाने भावाच्या औषधोपचारासाठी सतिश भाटी याच्याकडून दरमहा 15 टक्के व्याज दराने 30 हजारांची रक्कम घेतली. त्याबदल्यात दुचाकीची कागदपत्रे आणि दोन धनादेश भाटीला दिले. आरोपीने साथीदारासह तरूणाच्या घरात शिरून 22 महिन्यांचे व्याज आणि मूळ असे 1 लाख 29 हजारांची मागणी केली. रक्कम न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. भाटीने तरूणाचा धनादेश बँकेत वठवून 19 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर युनीट एकने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या दुकानासह घरामध्ये 64 धनादेश, बँकेचे 16 पासबुक, मोबाइल असा 10 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, राहुल मखरे, अनिकेत बाबर , शशिकांत दरेकर दत्ता सोनवणे, अभिनव लडकत, रुखक्साना नदाफ यांनी केली.





























































