
दुचाकीवर आलेल्या 10 ते 12 जणांच्या टोळक्याने तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना कोंढव्यातील टिळेकरनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी युवराज देवकाते उर्फ वायडी (रा. टिळेकरनगर) आणि कविराज देवकाते उर्फ केडी याच्यासह 10 जणांविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य बनसोडे असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा मित्र रोहित माने (23) याने तक्रार दिली आहे.
दोन दिवसांपुर्वी रात्री साडेआठच्या सुमारास आदित्य आणि त्याचे मित्र टिळेकरनगरमधील बसस्थानाकाजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या टोळक्याने आदित्यला शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाणीत आदित्य गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचे नेमके कारण समजू शकले नसून आरोपींचा शोध घेतल्यानंतर घटनेचा उलगडा होणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळीस यांनी दिली आहे.






























































