
शेतामध्ये पाणी भरत असणाऱ्या युवकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. दैव बलवत्तर म्हणून युवक या हल्ल्यातून बचावला. सदर घटना राजुरी येथील गोरे वस्तीजवळ शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून परिसरात अनेक ठिकाणी बिबट्यांचा संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महेश सुधाकर बेंद्रे हा युवक हल्ल्यात जखमी झाला आहे. नरभक्षक बिबट्याचे मानवारील सत्र थांबत नसल्याचे दिसत आहे. राहाता तालुक्यातील राजुरी गावाच्या शिवेला पाण्याच्या तळ्याजवळ लोकवस्ती व शेतकऱ्यांची शेती आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान महेश सुधाकर बेंद्रे याची गट नंबर 211 मध्ये शेती मध्ये सकाळी पहाटे पाचच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी गेला होता. पाणी भरण्याचे चालू असताना मोटारीचे पाणी कमी पडले म्हणून म्हणून तो आपल्या गव्हाच्या शेतामधून मोटारी कडे जात असताना मागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. प्रथम या बिबट्याने त्याच्या पायाला पकडले ते त्याने कसेबसे सोडविले त्यानंतर बिबट्याने परत त्याच्या मानेजवळ पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यानेही बिबट्याशी दोन हात करून सोडविण्याचा कसाबसा प्रयत्न केला, मात्र बिबट्याने त्या युवकावर तिसऱ्यांदा हल्ला चढविला. या हल्ल्यातून त्याने आपली कशीबशी सुटका करून घेतली. घाबरलेल्या अवस्थेत शेजारी असणाऱ्या वस्तीकडे त्याने आरडाओरडा करून मदत मागितली. परंतु लोकवस्ती लांब असल्यामुळे त्याचा आवाज पोहोचलाच नाही.
तसाच पुढे जाऊन शेतकरी गोकुळ गोरे व अन्य शेतकऱ्यांना त्याने माझ्यावर बिबट्याने हल्ला केला. यानंतर वस्तीतील शेतकरी व महिलांनी त्या युवकाकडे त्याची विचारपूस करून धीर दिला त्यानंतर त्याला लोणी येथील सरकारी दवाखान्यात उपचारार्थ पाठवण्यात आले. प्राथमिक उपचारा नंतर त्यास नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले.
































































