पुण्यात लॉकडाउनमध्ये मंदीरातील दानपेट्या रामभरोसे, 8 मंदीरातील दानपेट्या फोडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नवनाथ शिंदे

पुणे शहरातील विविध ठिकाणी असलेल्या मंदीरातील दानपेट्या रामभरोसे असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाउनमुळे बेरोजगारी, कामधंदा न मिळणे, व्यसनासाठी पैसे न मिळाल्यामुळे चोरट्यांनी थेट मंदीरातील दानपेट्यावर डल्ला मारला जात आहेत. मागील काही दिवसांत विश्रामबाग, फरासखाना, समर्थ, खडकी, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदीरातून दानपेट्या फोडून रक्कम चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 7 मंदीरे आणि एका चर्चमधील दानपेटी चोरून नेल्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळ असलेल्या श्री शारदा गणपती मंदिरात चोरट्यांनी 8 जानेवारीला मध्यरात्री डल्ला मारला होता. तब्बल 22 ते 25 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली होती. पुणेकरांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या गणेश मंदिरात चोरी झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एका सराईताला अटक करून ऐवज जप्त करण्यात आला होता. त्यानंतर चोरट्यांनी 10 ते 11 फेब्रु्वारीला खडकी परिसरातील एका चर्चमधून दानपेटीच चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. चर्चच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी दानपेटीतील 3 हजारांची रोकड आणि दानपेटी असा 4 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर दर्शनाच्या बहाण्याने चोरट्यांनी गणेश पेठेत असलेल्या डुल्या मारूती देवस्थान मंदीरातील श्री विठ्ठल रखुमाईच्या दानपेटीतून 1 हजार 280 रूपयांची रोकड चोरून नेली आहे. त्यामुळे मंदीरातील दानपेट्याही सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.

काही दिवसांपुर्वी शहरातील नाना पेठेत असलेल्या श्री शितळादेवी मंदीरातून चांदीचा मुकीट चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तडीपार चोरट्याला अटक केली होती. नाना पेठेतील नवा वाडा परिसरात असलेल्या श्री शितळादेवी मंदिरातून चांदीचे मुकुट चोरीला गेला होता. त्यानंतर पथकाने सापळा रचून सराईताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने श्री शितळादेवी मंदीरातील चांदीचा मुकूट चोरटल्याची कबुली दिली. त्यानंतर चोरट्यांनी बुधवार पेठेतील फडके हौद चौकात असलेल्या गणेश मंदीरातील दानपेटी फोडून रक्कम चोरून नेली. ही घटना 5 मे ला पहाटेच्या सुमारास घडली आहे. बुधवार पेठेतील फडके हौद चौकात म्हसोबा मित्र मंडळाचे गणेश मंदीर आहे.

शहरातील विविध भागातील मंदीरातून दानपेटी चोरीला जाण्याचे सत्र कायम असल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांनी गुरूवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन मंदीरातून दान पेटीच चोरून नेली आहे. त्यामध्ये भाविकांनी केलेल्या दानासह 1 लाख 53 हजारांचा ऐवज होता. ही घटना 16 ते 17 मे कालावधीत घडली आहे. त्यानंतर चोरट्यांनी शुक्रवार पेठेतील दोन मंदीरातील दानपेटीतून पैसे चोरून नेण्याची घटना १९ मेला घडली आहे. चोरट्यांनी गणेश मंदीरासह दोन मंदीरातून दानपेटीतील रक्कम चोरून नेली आहे. चोरट्यांनी गणेश मंदीराचे शटर उचकटून मंदीरातील दानपेटीचे झाकण उघडून 800 रूपयांची चोरी केली. त्यानंतर चोरट्यांनी सुभाषनगर परिसरातील आचार्य अत्रे सभागृहानजीक असलेल्या मंदीरातील दानपेटीतील पैसे चोरून नेले आहेत. लॉकडाउनमध्ये कामधंदा मिळत नसल्यामुळे चोरट्यांकडून मंदीरातील दानपेट्या फोडल्या जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मंदीर ट्रस्ट्रीकडून या उपाययोजना आवश्यक

  • मंदीरासह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
  • मंदीर आवारात दानपेट्या सुरक्षित जागी ठेवणे
  • प्रत्येक आठवड्यात सीसीटीव्हीची पडताळणी करणे
  • मंदीराभोवती संशयास्पद फिरणाNयांची माहिती पोलिसांना देणे

पोलिसांची जबाबदारी

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदीर समिती ट्रस्टीसोबत संवाद
रात्रपाळीला गस्त घालताना मंदीर परिसराला प्राधान्य देणे
मंदीर ट्रस्ट्रीकडे सीसीटीव्ही बसविण्यास सांगणे
मंदीर परिसरात सातत्याने पेट्रोलिंग करणे
सातत्याने होणाNया दानपेट्यातील चोरी रोखण्यावर भर देणे