‘दंडात्मक वसुली करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’, वाहतूक कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या सूचना

647
police

शहरातील बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध जास्तीत जास्त पेड कारवाई (दंडात्मक वसुली) करण्याची सूचना वरिष्ठांनी वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपेक्षित कारवाई न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

लॉकडाऊनंतर सुमारे चार महिन्यांनी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, किरकोळ कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना वाहतूक विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आजपासून नागरिकांकडून दंडवसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पैसे नसल्यामुळे वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये तू-तू, मै-मै होत आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई आणि वसुली कशी करणार असा सवाल अनेकांनी विचारला आहे. व्हर्जुअल मशीनद्वारे वाहतूक कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त पेड कारवाई करावी. काही कारणांमुळे केसेस अनपेड झाल्यास त्या तत्काळ न्यायालयाकडे पाठविण्याची सूचना कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे. वाहतूक नियमनासाठी विविध चौकात थांबलेल्या कर्मचाऱ्यांनी दररोज किमान 30 ते 35 दंडात्मक कारवाया करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशाची 100 टक्के अमंलबजावणी करावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

कर्मचाऱ्यांची ऑनफिल्ड लढाई

वाहतूक नियमनासह बेशिस्त वाहनचालकांकडून दंडवसुली करताना कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत होत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे सक्त दंडात्मक वसुलीच्या आदेशामुळे कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. लॉकडाउनमध्ये बंदोबस्त, ड्युटी, वाहतूक नियमन करताना कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर लगेचच व्हर्चुअल मशीनद्वारे तत्काळ दंडवसुली करण्याच्या सूचनेमुळे हवालदिल झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या