लॉकडाउनमध्ये नवरा-बायकोचा सुसंवाद वाढला, महिलांच्या तक्रारींचे प्रमाण घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नवनाथ शिंदे

लॉकडाउनमध्ये शहरातील दाम्पत्यांचे नाते अधिकच घट्ट असल्याचे दिसून आले आहे. नवरा-बायकोचा सुसंवाद वाढल्यामुळे तक्रारींचे प्रमाण घटल्याची नोंद पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे करण्यात आली आहे. त्याशिवाय प्राप्त तक्रारींमध्येही संबंधितांचे समुपदेशन करून त्यांच्यातील दुरावा कमी करण्याचे काम पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केले आहे.

कौटुंबिक हिंसाचार टाळण्यासाठी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडून प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे दाम्पत्यातील दुरावा कमी झाला आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांकडून जोडीदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण केले जात आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये घरी असतानाही तक्रारींचे प्रमाण घटले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आठ महिन्यांत भरोसा सेलकडे महिलांच्या विविध प्रकाराच्या 903 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 139 तक्रारींवर मार्ग काढून जोडीदारांमध्ये समझोता निर्माण करण्यात आला. त्याशिवाय 24 प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. दाखल तक्रारींपैकी महिलांना त्रास 48 नवऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तर 75 प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे पाठविण्यात आली.

लॉकडाउनपुर्वी भरोसा सेलकडे महिला तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक होते. जानेवारी ते मार्च अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत 715 तक्रारींची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 461 प्रकरणांमध्ये भरोसा सेलने मध्यस्थी करून नात्यांमधील अंतर कमी केले आहे. उर्वरित 102 प्रकरणे संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये पाठविण्यात आली. तर 37 जणांविरूद्ध गुन्हे दाखल करून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचारतही आधार म्हणून महिलांना पुणे पोलिसांच्या भरोसा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

”महिला कौटुंबिक हिंसाचार संपुष्टात आणण्याचे काम भरोसा सेलकडून करण्यात येत आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींद्वारे अर्जदारासह विरोधी पक्षकाराला बोलावून कौटुंबिक अडचणी समजावून घेत मार्गदर्शन केले जात आहे. त्यानंतर समुपदेशन करुन त्यांच्या नात्यातील दुरावा कमी केला जात आहे. भरोसा सेलसह जेष्ठ नागरिक कक्षात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून योग्य कामाची पावती मिळत आहे.” – बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

महिला तक्रारीचा आलेख घटना

कौटुंबिक हिंसाचारात जानेवारी ते मार्चदरम्यान दरदिवशी साधारणपणे 7 तक्रारींची नोंद भरोसा सेलकडे करण्यात येत होती. त्यानंतर कोरानामुळे लॉकडाउन करण्यात आल्यानंतर भरोसा सेलकडे दिवसाला 3 ते 4 तक्रारी नोदंविण्यात येत होत्या. त्यामुळे मागील आठ महिन्यांत कौटुंबिक हिंसाचारात तक्रारी कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कौटुबिंक हिंसाचार जानेवारी ते नोव्हेंबर

  • लॉकडाउनपुर्वी तक्रारी- 715 प्रकरणे
  • समुपदेशन करुन समझोता- 461 प्रकरणे
  • पोलीस ठाण्यांकडे वर्ग- 102 प्रकरणे
  • लॉकडाउननंतर महिला तक्रारी – 903
  • समुपदेशन करुन समझोता- 139