
‘छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन या मातीशी एकरूप राहण्याची शपथ घेतल्यानंतर आपले सरकार हे एक वारसा घेऊन आले आहे. हा वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे,’ अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘अजितदादा, इतके वर्षं आपण उगाच दूर होतो. मधली वर्षं वाया घालवली. उगाच एवढी वर्षं वेगळं राहिलो. अधीच एकत्र यायला हवं होतं. पहिल्यांदाच तीन पक्ष एकत्र आलेत. जे काही चांगलं करायचं आहे, ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही,’ असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरीवर दिले.
किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपण वेगवेगळ्या पक्षांचे सर्वजण एकत्र आलो आहोत ते कोणताही पक्ष म्हणून नव्हे, तर शिवभक्त म्हणून. आपण आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, ‘अजितदादा, उगाच आपण एवढी वर्षं वेगळे राहिलो. आधीच एकत्र यायला हवं होतं. आता जे काही करायचं ते चांगलंच करून दाखवू!’
राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं, त्यावेळी काहींच्या पोटात दुखलं. त्यांना वाटलं की, हे काय तीन पक्षांचं सरकार एकत्र आलंय. हे सरकार कसं काय चालणार? पण इथे तीनही पक्षांचे खंदे कार्यकर्ते आणि नेते एकत्र आहेत. आणि वेगवेगळा विचार कोणता? प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिवरायांचा भगवा आहे. हा एक विचार आहे. आमच्या धमन्यांमध्ये भगवा आहे आणि या मातीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ आम्ही शिवरायांची प्रेरणा घेऊन घेतली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
‘आपले सरकार हे एक वारसा घेऊन आले आहे आणि हा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आम्ही आता एकत्र आलेलो आहोत. आता आम्ही जे काय करायचं आहे, ते चांगलं ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढे एक वचन व एवढी एक शपथ जिजाऊ आणि शिवरायांच्या साक्षीने देतो,’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.





























































