पुणे – वॉचमनने केला महिलेचा विनयभंग, पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेजुरी येथे जमिनीच्या वादातून शेजारी राहणार्‍या महिलेचा विनयभंग करून फरार झाल्यानंतर पुण्यात वॉचमन म्हणुन काम करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. कात्रज लेक टाऊन परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

दशरथ मारुती बांगर (रा. बांगरवाडी, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी येथे ही घटना घडली होती. फिर्यादी आणि आरोपी बांगर हे शेजारी राहण्यास आहेत. त्यांच्यात जमिनीवरून वाद होते. यातूनच 12 तारखेला रात्री दशरथ बांगर याने फिर्यादी यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अंगावरील कपडे काढून महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून तेथून पसार झाला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या मागावर होते. दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पथक शहरात गस्त घालत असताना विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बांगर हा कात्रज लेकटाऊन येथे वॉचमन म्हणून काम करत असल्याची माहिती अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख यांना मिळाली होती. यानुसार सापळा रचून बांगर याला पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. पुढील तपासासाठी आरोपीला आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अमोल पवार , अजय थोरात , इम्रान शेख, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.